हेलन केलर हे आजच्या जगाला सर्वपरिचित असलेले केवळ एक व्यक्तिनाम नाही. माणसाच्या अदम्य आत्मविश्वासाचे आणि अपराजित, विजिगीषु वृत्तीचे ते एक सुंदर प्रतीक आहे. निसर्गाने दिलेल्या पंचेंद्रियांच्या साह्याने माणूस परस्परांशी, भोवतालच्या जगाशी संवाद साधतो. हेलनची तर तीन ज्ञानेंद्रिये निसर्गाने हिरावून घेतली होती. ती आंधळी होती. बहिरी होती. मुकीही होती. परस्परांशी संपर्क जोडण्याचे स्पर्श हे एकमेव साधन तिला लाभले होते. पण आशावादी मनोवृत्ती, विलक्षण जिद्द आणि अपरंपार परिश्रमशीलता यांच्या बळावर तिने या सा-या उणिवांवर मात केली. आपले स्वत:चे जीवन तर तिने अर्थपूर्ण केलेच; पण जगातील सर्व अंध, मूकबधिर यांनाही तिने प्रगतीच्या, विकासाच्या वाटा खुल्या करून दिल्या. त्या हेलन केलरची ही जीवनगाथा. जितकी वेधक, रोमांचकारक, तितकीच स्फूर्तिदायक...