आचार्य अत्रे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता; पण काही कारणाने अत्रे आणि काँग्रेस यांच्यात वितुष्ट आलं आणि अत्रे काँग्रेसच्या बाहेर पडले. अत्र्यांनी काँग्रेसवर, विशेषत: यशवंतराव चव्हाण आणि पंडित नेहरूंवर आपल्या लेखणीने नेहमीच शरसंधान केलं. ‘काँग्रेस विरुद्ध महाराष्ट्र’ या पुस्तकातून अत्र्यांमधील कट्टर काँग्रेस विरोधकाचं दर्शन घडतं. यशवंतरावांची नेहरूनिष्ठा आणि नेहरूंचा महाराष्ट्रद्वेष यावर अत्र्यांनी कडाडून टीका केली. यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात घेतलेली भूमिका, आणीबाणीच्या वेळी यशवंतरावांनी काँग्रेसचा केलेला त्याग आणि त्यादरम्यान इंदिरा गांधींनी त्यांची केलेली निंदा आणि यशवंतरावांची मलिन झालेली प्रतिमा, भाषावार प्रांतरचनेला नेहरूंनी केलेला विरोध इ. अनेक महत्त्वाच्या घटनांवर या पुस्तकातून तपशीलवार भाष्य करण्यात आलं आहे आणि अत्र्यांच्या निर्भीड, पारदर्शक व्यक्तिमत्त्वाचं दर्शनही घडवलं आहे.
श्रीधर व्यंकटेश कानडे हे आचार्य अत्रे यांचे शिष्य असल्याने खरे तर बाबूराव कानडे म्हणून सर्वत्र ओळखले जातात. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. ते एम.ए., एल.एल.बी. आहेत व आयुर्विमा महामंडळात विमाकामगारांचे सरचिटणीस असल्याने कामगार वर्गाला परिचित आहेत. त्यांची ‘चतुर अशा बायका’, ‘पौडाचं पाव्हणं’, ‘रिकामा न्हावी’, ‘गाढवही गेले अन् ब्रह्मचर्चही गेले’ अशी विनोदी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘असावे घरटे आपुले छान!’ हे नाटकही त्यांनी लिहिले आहे. आचार्य अत्रे यांच्या वाङ्मयाचे व्यासंगी म्हणून ते परिचित आहेत. आचार्य अत्रे यांचा ‘आत्मा’ म्हणजे विनोद म्हणून ‘विनोद विद्यापीठ’ या समर्पक स्मारकाने आचार्य अत्रे यांची स्मृती जागवली. आचार्य अत्रे स्मृति प्रतिष्ठान, पुणे याचे ते संस्थापक - अध्यक्ष आहेत.
E-mail - [email protected]