मग ते आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘आज माझ्या हातून सगळीकडं मिळून आठ-दहा उद्घाटनं झाली. त्यामुळं हे कशाचं उद्घाटन आहे, हे आता माझ्या लक्षात नाही; पण तरीसुद्धा हे उद्घाटन झालं, हे मी जाहीर करतो. जीवनात उद्घाटनाला फार महत्त्व आहे. त्याशिवाय एकही गोष्ट होत नाही. मुलगा शाळेला जातो पहिल्या दिवशी, म्हणजे त्याच्या शिक्षणाचं उद्घाटनच असतं. मुलगा जन्माला येतो म्हणजे तर काय? त्याच्या जन्माचं उद्घाटन. फार काय हिंदी सिनेमात सुहागरात दाखवत्यात, ते म्हणजे संसाराचं एक प्रकारे उद्घाटनच असतं!’’ या थाटात खुशालरावांचे सुमारे दोन तास भाषण झाले. हसून हसून लोकांची पोटे दुखू लागली. त्यांचे हे भाषण प्रारंभीचे न ठेवता मनोरंजनाच्या कार्यक्रमातच ठेवले असते, तर फार बरे झाले असते, असे अनेकांना वाटले.