मी नं, आज एका दारातून आत शिरले. एकच पाऊल टाकलं आणि तशीच उभी राहिले. ते उघडं दार इतवंâ सुंदर दिसत होतं की... दाराच्या आतलं पाऊल पुन्हा बाहेर घेतलं. उघड्या दाराची चौकट इतकी छान होती, की मंत्रमुग्ध झाले. असं दार दिसायला हवं. पण माणसं अधाशी असतात. जरा फट दिसली, तरी धक्के मारमारून आत घुसतात. आतलं सर्व काही ओरबाडून घेतात, तरीही समाधान मिळत नाही. समाधान होत नाही. मग दुसरी फट...! असा अधाशीपणा मीही केलाच केव्हातरी. आता मात्र सताड उघडं दार, सहजी आत जाता येतंय, पण... आपल्यासाठी एक दार उघडं आहे, हे बघूनच समाधान होतंय.