‘राग’ या भावनेवर क्रेद्रित असलेलं पुस्तक आहे ‘द डान्स ऑफ अँगर.’ या पुस्तकातून राग या भावनेचा (विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत) विविध दृष्टिकोनांतून विचार केला गेला आहे. स्त्रीला रागावण्याचा अधिकार नाही, असं समजलं जातं आणि ती रागावली तर तिला नकारात्मक विशेषणं लावली जातात, याकडे लेखिकेने लक्ष वेधलं आहे. स्त्रीचं रागावणं लोकांना का नको असतं, स्त्रीला रागावतानासुद्धा विचार का करावा लागतो, तिच्या रागावण्याचे परिणाम काय असतात याविषयी या पुस्तकात चर्चा केली आहे. तसेच राग आलेला असतानाही शांत राहण्यामुळे, ‘स्व’ची जाणीव कशी बोथट होत जाते, याबद्दलही लेखिकेने लिहिलं आहे. राग व्यक्त करण्याची पद्धत आणि त्यामुळे होणारे तोटेही लेखिका लक्षात आणून देते. रागाला जर विधायक वळण लावायचं असेल तर काय करायचं, याचं मार्गदर्शन लेखिकेने केलं आहे. स्त्रीची रागाची भावना पुरुषप्रधान संस्कृतीमुळे कशी दाबली जाते आणि त्यामुळे तिची क्षमता कशी झाकली जाते, याचीही चर्चा या पुस्तकात केली आहे. ज्या गोष्टीसाठी राग व्यक्त केला जातो, त्या गोष्टीसाठी अन्य पर्यायांचा विचार कसा करता येऊ शकतो, याचंही मार्गदर्शन या पुस्तकातून केलं आहे. स्वची स्पष्टता, नवरा-बायकोंमधील भांडणं हे मुद्दे सोदाहरण पटवून दिले आहेत. थोडक्यात, राग या नैसर्गिक भावनेला विधायक वळण देऊन, त्याचा सकारात्मक उपयोग करून आपल्या जीवनात आणि व्यक्तिमत्त्वात कसा बदल घडवून आणायचा, याचं नेमकं मार्गदर्शन या पुस्तकातून होतं. त्यामुळे हे पुस्तक व्यक्तिमत्त्व विकासासाठीही उपयुक्त ठरावं.