न्यू यॉर्क १९३९. टॉम ब्रॅडशॉ याला खुनाच्या आरोपाखाली अटक होते. आपल्या सख्ख्या भावाचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर असतो. सेफ्टन जेल्क्स हा न्यू यॉर्क मधील अत्यंत नावाजलेला वकील कोणताही मोबदला न घेता त्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे येतो आणि अगदी कमीत कमी शिक्षा मिळवण्याची हमी देतो. तेव्हा त्याचा हा प्रस्ताव स्वीकारण्यावाचून टॉम ब्रॅडशॉपाशी दुसरा काही पर्यायही नसतो. टॉमवर खटला चालवण्यात येऊन त्यात त्याला अपराधी ठरवण्यात येते. आणि जेव्हा शिक्षा भोगण्यासाठी त्याची रवानगी तुरुंगात करण्यात येते, तेव्हा मात्र आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी त्याच्यासमोर केवळ एकच मार्ग असतो. तो म्हणजे, आपली खरी ओळख जगापुढे उघड करणे. पण त्याला स्वत:च्या प्राणाहूनही अधिक प्रिय असलेल्या एका स्त्रीला त्यामुळे काही त्रास होऊ नये म्हणून तसं कदापि न करण्याची शपथ त्याने घेतलेली असते. दरम्यान ही तरुण स्त्री, त्या दोघांच्या प्रेमातून जन्माला आलेल्या त्यांच्या बाळाला घरी ठेवून न्यू यॉर्कला येते. आपल्या बाळाच्या पित्याला कसेही करून शोघून काढून त्याच्याशी लग्न करायचे असा दृढनिश्चय तिने केलेला आहे. त्याचे समुद्रात बुडून अपघाती निधन झाल्याची ऐकीव बातमी खरी मानायला तिचे मन तयारच नाही. आपला प्रियकर जिवंत असण्याचा एकमेव पुरावा तिच्या डोळ्यासमोर आहे, तो म्हणजे एक पत्र! कधी न उघडण्यात आलेले पत्र! ब्रिस्टॉलच्या एका घरातील टेबलावर गेले वर्षभर बंद पाकिटात असलेले ते पत्र! जेफ्री आर्चर यांच्या या महाकादंबरीत जसजशी एक-एक करून कौटुंबिक रहस्यं उलगडत जातात, तशी-तशी त्या परिवाराच्या सदस्यांची निष्ठा पणाला लागते. या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या महान कादंबरीकाराबरोबर आता आपल्याला सर्वांना एका प्रदीर्घ प्रवासाला निघायचे आहे. या प्रवासात तुम्हाला कुठेही ‘स्टॉप साइन्स...’ ‘वन वे रोड साइन्स...’ विंâवा ‘डेड एंड साइन्स...’ आढळणार नाहीत...!