‘निरंजन’च्या लेखनातला सूक्ष्म विनोद मला फार आवडतो, असं श्री. घाटे यांचे बरेच लेखकमित्र आणि वाचकमित्र म्हणतात. श्री. घाटे यांनी उमेदीच्या काळात ‘मनोहर’मध्ये ‘मेरी गो राऊंड’ हे हलकं फुलकं, विनोदाची झाक असलेलं सदर चालवलं होतं. याशिवाय ‘वटवट’ नावाच्या विनोदाला वाहिलेल्या मासिकाची बरीच जबाबदारी – विशेषत: पानं भरायची जबाबदारी घाटे यांच्यावर असे. घाटे यांना जवळून ओळखणाऱ्याना घाटे यांच्याकडे असलेल्या विनोदांचा साठा किती मोठा आहे याची कल्पना आहेच; पण त्यांच्या बोलण्यातला मिस्कीलतेचा भावही ते विसरू शकत नाहीत. घाटे यांच्या मूळ स्वभावाचा परिचय करून देणाऱ्या या एक प्रकारे गप्पाच आहेत. ते विज्ञानलेखनाकडे वळले आणि त्यांचं असं हलकं फुलकं लेखन मागं पडलं. ‘ज्याचं करावं भलं’ द्वारा या त्यांच्या कथांना पुन्हा उजाळा मिळतोय, ही एक चांगली गोष्ट आहे़ या कथांमुळे तत्कालीन तरुणाईचंही दर्शन आजच्या वाचकाला होईल.