सुशिक्षित पांढरपेशांच्या सुरक्षित टीचभर जगाबाहेरही
पदोपदीच्या अपमानांचे व दु:खांचे हालाहल पचवीत
नियतीशी चिवटपणे झुंजत जगणा-या
शेतकरी-कामकरी-मजूर-ड्रायव्हर-
वारयोषिया आदि पददलित लोकांचं एक विशाल असं जग आहे.
हेच जग लेखनाची प्रेरणा व शक्ती...
‘चिताक’मध्ये कथा आहेत त्या ह्याच जगातील लोकांच्या,
रखरखीत व्यथांच्या व सुखाच्या थंडगार झुळकांच्याही.
चाकोरीबद्ध ग्रामीण वाङ्मय वाचून ग्रामीण बोली खेड्यापाड्यातील
केवळ शेतकरीच नित्य बोलत असतो असा जो समज सर्वसामान्य
मराठी वाचकांत रूढ झाला आहे, त्याला ‘चिताक’मुळे
छेद जायला हरकत नाही.