स्त्री- पुरुष संबंधातील शोध हा न संपणारा आहे. माणसाचे मन हा विषयच कधीही तळ न सापडणारा असा. त्यात स्त्री-पुरुष नाते हे कितीतरी वेगळ्या पातळीवर असणारे. या नात्यांना समजून घेऊन त्याप्रमाणे वागताना मनात असलेले खूप काही क्षण निसटून जातात. हे निसटलेले क्षण मनाच्या तळात सुखरूप असतात. असे निसटलेले क्षण माणसाला अनुभवता येतात. पण सर्जनशील कलाकाराला अचूक,मार्मिक शब्दात साकारताही येतात. आशा बगेंनी हे निसटलेले क्षण कथासप्तकात सादर केले आहेत. या सर्व कथांमध्ये आशा बगेंची एक खास भाषाशैली आहे. गुंतागुंत, उकल,निराकरण अशा पायर्या किंवा सनसनाटी घटना या सगळ्याच पायर्या ओलांडून या कथा एका उंचीवर पोहोचतात. नातेसंबंध जपताना निसटलेले क्षण उलगडणार्या भावस्पर्शी कथा.