गाईला सर्व देवतांचं स्वरूप मानून तिची पूजा करणारा काळिंगज्जा आणि तिला केवळ दूध आणि मांस देणारा प्राणी मानणारा त्याचा अमेरिकेतून परतलेला नातू या दोघांच्या मूल्यसंवेदनांवरील संघर्ष हा या कादंबरीचा विषय. भारतातल्या बहुतेक सगळ्या भाषांमध्ये प्रचलित असलेल्या गाईच्या गाण्यानं सुरू होत असलेली ही कादंबरी भारतीय संस्कृतीच्या मुळाशी जाऊन काही मूल्यांचा शोध घेताना दिसते. या कलाकृतीवर आधारलेल्या कन्नड आणि `गोधुली' या हिंदी चित्रपटांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळवले आहेत. १९६८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीला आजही काही जण `उत्कृष्ट साहित्यकृती' मानतात. प्रेम आणि राग या दोन्ही प्रवृत्ती जागृत करणारी ही एक सशक्त कलाकृती आहे, हे निश्चित!