हर्ष, हुंदके आणि हुंकार यांचा हा नजराणा. हा नजराणा असंख्य वाचकांनी केलेला. रोज कुणाचं ना कुणाचं पत्र दारासमोर रांगोळी काढत येतं. ‘तुम्ही आम्हाला ओळखत नाही, पण आम्ही तुम्हाला ओळखतो.’ यासारख्या परिचयाच्या ठिपक्याठिपक्यांनी रांगोळी प्रगट होते. रांगोळी काढणाऱ्याचे हात दिसत नाहीत आणि कधी कधी नावही कळत नाही. तसं झालं की आठवतो तो सांताक्लॉझ! पत्रांची भेट पाठवणारे सांताक्लॉझ! की त्यांची भेट माझ्या दारावरच्या प्लेझर बॉक्सपर्यंत पोहोचवणारा खाकी वेषातला पोस्टमन सांताक्लॉझ? हे कोडं सुटत नाही. जाऊ दे! न सुटू दे. संवादाचा पूल ऐलथडीला जोडणारी प्रत्येक कमान सारख्याच तोलामोलाची. सगळेच सांताक्लॉझ. सांताक्लॉझची पावलं आता आपोआप ऐकू येतात. ती वेळ अचूक समजते. पण एखादाच दिवस असा उगवतो की त्या दिवशी ती चाहूल येत नाही. ऐन दुपारी येणारा रातराणीचा सुगंध त्या दिवशी येत नाही.