अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम यांनी 2002 ते 2007 या कालावधीत भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला. पद्मभूषण, पद्मविभूषण आणि देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न या पुरस्काराचेही ते मानकरी होते. डॉ. कलामांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे एरॉनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले. भारताच्या पहिल्या उपग्रह संचलित वाहनाचा - एसएलव्ही- 3चा विकास; भारताच्या लष्करी डावपेचांच्या क्षेपणास्त्र प्रणालींची बांधणी व संचालन; आणि 1988च्या अणुचाचण्यांमध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2020पर्यंत भारताचे रूपांतर एका विकसित राष्ट्रात करण्याकडे त्यांचे विशेष लक्ष होते. या हेतूने, आयआयटी आणि आयआयएममध्ये अध्यापन कार्यासाठी, परिषदांमध्ये व्याख्याने देण्यासाठी आणि सर्व क्षेत्रांमधील विद्यार्थी व लोकांना भेटण्यासाठी ते सातत्याने देशभर प्रवास करतच राहिले.