देसाईंच्या कथा खर्या अर्थानं फुलल्या त्या ऐतिहासिक वातावरणात व अस्सल ग्रामीण ढंगात, परंतु सूक्ष्म निरिक्षणशक्ती आणि अत्यंत संवेदनशील मन यामुळं त्यांना शहरी जीवनातील मर्मभेदी सत्य दर्शनानं अस्वस्थ केलं. यातूनच "प्रपात’ च्या कथांचा जन्म झाला. देसाईंच्या नेहमीच्या कथांपेक्षा या कथा वेगळ्या आहेत. जीवनातील विशिष्ट क्षणांविषयी, नाट्याविषयी, शहरीजीवनात हरघडी अनुभवायला येणार्या कठोर, रूक्ष क्षणांविषयी विचार करायला लावणार्या आहेत. या कथा अभिजात, संतुलित रूपात्मक जाणिवेच्या आहेत. "स्पर्श’ या कथेत नोकरी करणार्या शहरातील स्त्रीला ज्या बिभित्स नजरा, ओंगळवाणे स्पर्श व त्याच त्या किळसवाण्या भावनांच्या प्रवाहातून दररोज जावे लागते, यामुळं तिच्या मनावर उठणार्या ओरखड्यांचे चित्रण आहे. तर "मृद्गंध’ मध्ये एका वारांगनेच्या मनाची हळूवार ओळख आहे. कथा जसजशी वाचत जावी तसतसा वाचक त्यात गुंतत जातो आणि कथेचा शेवट त्या विचारांना चालना देतो.