तीन अंकी नाटक...ही लग्नगाठ दोन पोलादी पट्ट्यांना केलेल्या वेल्डिंगसारखी असते. ते दोन जीव अधिक सामथ्र्यवान बनतात, ते त्या वेल्डिंगमुळं. जीवन कुणासाठी थांबत नाही. ते पुढं जातच असतं. मुलं-बाळं वाढतात. जुन्यांची सोबत हरवते. अनेक सुखदु:खाचे क्षण येतात. हे सारे बदल घडत असताना तुम्ही मात्र एकत्र असता. त्या एकत्रपणाचा आनंद उपभोगत असता. खऱ्याअर्थानं पृथ्वीवरचा स्वर्ग तिथंच अवतरतो. ती एकरूपता आली, की जगात हवे तेवढे उत्पात होऊ देत, संघर्ष वाढू देत, संसार अबाधितच राहतो. राखेतून जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्यासारखा. ती ताकद तुम्ही मिळवलीत, की तुम्ही कुणालाही दुर्लक्षू शकता. निंदेला हसू शकता. जोवर तुमच्या पाठीशी कुणीतरी खंबीरपणे उभं आहे, याची खात्री असेल, तोवर कशालाही भिण्याची गरज नाही, कळलं?’