तो असा बसताच चाबूक कडाडे... वादी पिंजून जाई, तुटून जाई. निबार कातडीवर वळ उठत. दवबिंदूगत रक्ताचे थेंब अंगावर थरथरत उभे राहत. कोयंड्याची काठी चिंबून, एकेक कुंडं मनगटाएवढा उठे; पण सर्जा जागचा हलत नसे. हे बघून लोक त्याला `बशा' म्हणायचे. बशा बौल म्हणून सर्जाचं नाव बद्दू झालं. म्हातारपणी त्याच्या नशिबी बोल आला. त्याच्या गुणाला बट्टा लागला.... मृगाचा पाऊस सुरू झाला आणि सर्जाचं हाल कुत्र खाईनासं झालं. म्हशीपुढची काढलेली चिपाडं, शेणामुतात भिजलेला गदाळा त्याच्या वाट्याला येऊ लागला. पोट जाळायला तो तेसुद्धा खायचा-हपापून अपरूबाईनं खायचा. पण त्याच्या पोटाची खळगी भरली नाहीत. आतडी रिकामी राहिली. त्यात कामानं त्याची झडती घेतली आणि आता बसलं तर उठता येईना आणि उठलं तर बसता येईना अशी त्याची दशा झाली.