विचार नियम फॉर युथ
जीवनाच्या खेळात कोण बाजी मारणार?
मित्रांनो, लहानपणी तुम्ही नक्कीच सापशिडीचा खेळ खेळला असणार! हो ना? या खेळात आपण कधी शिडीच्या मदतीने एकदम वर जातो, तर कधी आपले फासे उलटे पडतात. मग सापाच्या तोंडात जाऊन क्षणार्धात आपण खाली कोसळतो. पण जो खेळाडू वारंवार सापाच्या तोंडात न अडकता केवळ पुढे जातो तोच आधी जिंकतो. हा तर साधा खेळ आहे. पण आयुष्याच्या खेळात कोण बाजी मारतं? तर स्वतःच्या विचारांना योग्य दिशा देणारा आणि ‘विचार नियमा’चा फासा वापरुन शंभराव्या नंबरापर्यंत सहजपणे पोहोचू शकणारा खेळाडू यशोशिखरावर विराजमान होतो.
काही तरूणांसाठी यशस्वी होणं खूपच सहज असतं, तर काहींना मात्र ते प्रचंड अवघड काम वाटतं. कुणाला कमी वेळेत उत्तम परिणाम प्राप्त होतात, तर काही थोडं वर चढल्यावर लगेच सापाच्या तोंडात अडकतात. थोडक्यात, त्यांच्या जीवनात ‘कभी खुशी, कभी गम’ हा खेळ सतत चालू असतो. कोणाकडे सुदृढ आरोग्याची संपत्ती असते, तर एखाद्याकडे पाहून वाटतं ‘यानं जणू आजाराशीच मैत्री केली आहे की काय!’ या जगात असंख्य युवक आहेत, पण बोटावर मोजण्याइतकेच लोक भविष्यात यशाचं शिखर गाठू शकतात. शिवाय त्या शिखरावर कायम टिकू शकतात. असं का होतं बरं? कारण काही युवकांकडे ‘विचार नियम’ नावाचा एक अद्भुत फासा असतो, जो त्यांना सतत यशाची शिडी चढण्याचं आणि सापालाही शिडी बनवण्याचं रहस्य सांगतो.
मित्रांनो, तुम्हीही ‘विचार नियम फॉर युथ’ या पुस्तकाच्या मदतीनं निसर्गाचे खास नियम समजून घेत आपल्या विचारांना योग्य दिशा देण्याच्या तंत्रात कुशल व्हा आणि हवं ते मिळवा. यशस्वी करीयर, खरे मित्र, सुखी कुटुंब, प्रेम, शांती, समृद्धी, वेळ, नात्यांमधील मृदुता, तनामनात भरपूर ऊर्जा, शुद्ध चारित्र्याची संपत्ती, यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्यं आणि जीवनाचं सौंदर्य वाढवणारं ज्ञान… अशा अगणित सकारात्मक गोष्टी मिळवण्याचं रहस्य प्रस्तुत पुस्तकात सामावलंय. तेव्हा यशाची शिडी चढण्यासाठी डबल क्लिक करायला तयार आहात?
सरश्रींचा आध्यात्मिक शोध त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असताना त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास केला. त्याचबरोबर आपल्या आध्यात्मिक शोधात मग्न राहून त्यांनी अनेक ध्यानपद्धतींचा अभ्यास केला. त्यांच्या या शोधाने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केले.
सत्यप्राप्तीच्या शोधासाठी जास्तीत-जास्त वेळ देता यावा, या तीव्र इच्छेने त्यांना, ते करत असलेले अध्यापनाचे कार्य त्याग करण्यास प्रवृत्त केले. जीवनाचे रहस्य समजण्यासाठी त्यांनी बराच काळ मनन करून आपले शोधकार्य सतत सुरू ठेवले. या शोधाच्या शेवटी त्यांना ‘आत्मबोध’ प्राप्त झाला. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवले, की सत्यापर्यंत पोहोचण्याच्या प्रत्येक मार्गांत एकच सुटलेली कडी (मिसिंग लिंक) आहे आणि ती म्हणजे ‘समज’ (Understanding).
सरश्री म्हणतात, ‘सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा आरंभ वेगवेगळ्या प्रकारे होतो, परंतु सर्वांचा शेवट मात्र ‘समजे’ने होतो. ही ‘समज’च सर्व काही असून, ती स्वतःच परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीकरिता या ‘समजे’चे श्रवणसुद्धा पुरेसे आहे’ हीच ‘समज’ प्रदान करण्यासाठी सरश्रींनी ‘तेजज्ञानाची’ निर्मिती केली. तेजज्ञान ही आत्मविकासातून आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याची संपूर्ण ज्ञानप्रणाली आहे.
सरश्रींनी दोन हजारांहून अधिक प्रवचन दिले आहेत आणि सत्तरपेक्षा जास्त पुस्तकांची रचना केली आहे. ही पुस्तके दहापेक्षा अधिक भाषांमध्ये रूपांतरित केली गेली असून, पेंगुइन बुक्स, हे हाऊस पब्लिशर्स, जैको बुक्स, हिंद पॉकेट बुक्स, मंजुल पब्लिशिंग हाऊस, प्रभात प्रकाशन, राजपाल ऍण्ड सन्स इत्यादी प्रमुख प्रकाशन संस्थांद्वारा प्रकाशित केली गेली आहेत. सरश्रींच्या शिकवणीने लाखो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडलं आहे. तसेच संपूर्ण विश्वाची चेतना वाढविण्यासाठी कित्येक सामाजिक कार्यांची सुरुवातही केली आहे.