माणूस यांत्रिकपणे जीवन तर जगत नाही ना?
आनंदाने जीवन जगणे खरंच कठीण आहे का?
या धावपळीच्या जीवनात एखादी मौल्यवान गोष्ट तर निसटून जात नाही ना?
माणूस फसवे जीवन तर जगत नाही ना?
विनाकारण मन व्याकूळ का होते?
रात्री झोप का लागत नाही?
मनाला अपूर्णतेची जाणीव का होत राहते?
सर्व काही मिळाले तरी मन असंतुष्ट का राहते?
संत-महात्म्यांना असे काय माहीत आहे, की ज्यामुळे त्यांच्या चेहर्यावर संतुष्टीचे तेज दिसते?
प्रापंचिक जीवनाशी संबंधित असे काही प्रश्न आहेत ते सर्वसामान्यपणे लोकांना आयुष्याच्या अंतापर्यंत सतावत राहतात व ते कधी संपत नाहीत. त्याउलट काही प्रश्न असे असतात जे जीवनाचे सत्य उलगडतात. अशा प्रश्नांची उत्तरे सापडली तर माणसाच्या मनातील सर्व प्रश्न एकाच वेळी समाप्त होतात. जसे,
सत्य काय आहे? किंवा असे म्हणू शकतो, की आपले सत्य काय आहे? आपले स्वरूप कोणते? जे आपण प्रत्यक्षात पाहतो ते की जे अदृश्य आहे? आज आपण ज्याला ‘मी’ किंवा ‘आम्ही’ असे संबोधतो, ते वास्तवात आपण आहोत का? आपले खरे अस्तित्व जाणून घेणे हे आपल्या जीवनाचे ध्येय आहे का? आज आपल्याला ज्या सुख-दुःखाची जाणीव होते ती खरी आहे की तो आपला भ्रम आहे? ज्या जगात आपण राहतो ते आपल्याला स्वतःपासून दूर तर घेऊन जात नाही ना? ज्याला आपण लाईक-डिसलाईक करतो तो आपल्या मनाचा खेळ अथवा /धारणा तर नाही?
‘मी कोण आहे’ हे जाणून घेण्याची तृष्णा जागृत झाली आहे का? स्वतःला जाणणे हे जीवनाचे शाश्वत सत्य आहे का? जर याचे उत्तर ‘हो’ असेल तर शाश्वत सत्याचा अनुभव घेता येतो का?
ज्यांना हे किंवा अशा प्रकारचे प्रश्न सतावत असतील त्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून शाश्वत सत्याचा संकेत मिळणार आहे यावर विश्वास ठेवा. कारण अज्ञान व बेहोशीमुळे माणूस बाह्य यश हेच आपल्या जीवनाचे उद्दिष्ट असे समजतो. पण तो आयुष्यात अयशस्वी ठरतो व आपला पृथ्वीवर जन्माला येण्याचा उद्देश काय आहे हे त्याला शेवटपर्यंत समजत नाही. त्यामुळे तो इतस्ततः भरकटत राहतो व परिणामस्वरूप अस्थायी आनंद प्राप्त करण्याच्या मागे धावत राहतो. प्रापंचिक आनंद त्याला खरा आनंद देऊ शकत नाही. कुठे ना कुठे त्याला अपूर्णता जाणवत राहते. कारण तो स्वतःचे खरे अस्तित्व विसरून, स्वतःला इतरांपेक्षा वेगळे मानून दिखाऊ आनंद प्राप्त करण्याच्या मागे लागतो. उदाहरणार्थ, समुद्रात उसळणार्या एखाद्या लाटेने स्वतःचे अस्तित्व वेगळे समजले व दुसर्या लाटेकडे पाहून ती दुःखाने म्हणू लागली, “मी तिच्यापेक्षा लहान आहे, माझ्यात पाणी कमी आहे. म्हणून लोक माझ्यावर सर्फिंग करत नाहीत, माझ्याकडे पाहून त्यांना आश्चर्य वाटत नाही, मला कोणी मदत करत नाही, मला कोणी मित्र नाहीत...” तर अशा वेळी तुम्ही त्या लाटेला काय म्हणाल? हेच ना की, “तुझ्यात पाण्याची कमतरता नाही. जरा स्वतःला योग्य प्रश्न तर विचार - की ‘मी कोण आहे?’ प्रश्नाचे उत्तरच तुला सांगेल की सारा समुद्र तुझाच आहे. जरा स्वतःला ओळख, जाणून घे.”
तुम्हाला माहीत आहे, की जेव्हा लाट स्वानुभवाने स्वतःचे मूळ स्वरूप जाणून घेईल व विशाल समुद्राशी एकरूप होईल, तेव्हा तिचे सारे ताण-तणाव, दुःख, समस्या एकाच वेळी समाप्त होतील.
ही गोष्ट एक संकेत आहे. पुस्तक वाचताना तुम्ही हे अनुभवाने जाणाल. त्याचबरोबर ‘मी शरीर नाही’ याचीही जाणीव तुम्हाला होईल. त्या वेळी तुम्हाला प्रत्येक घटना व परिस्थितीतून मुक्त झाल्याची जाणीव होईल. परंतु लहानपणापासून झालेल्या प्रोग्रामिंगमुळे व खोलवर रुजलेल्या सवयींमुळे काही काळानंतर तुम्ही पुन्हा स्वतःचे मूळ स्वरूप विसरून सुख-दुःखाच्या चक्रात अडकाल. अशा वेळी या पुस्तकात सांगितलेली रूपके पुनःपुन्हा वाचा व त्यावर सखोल मनन करा. हे कार्य इतक्या उत्कटतेने व आवडीने करा, की सध्याचा अनुभव तुमच्या अंतर्मनाच्या तळाशी पोहोचेल व तो तुमचा संस्कार बनेल.
जसे स्त्री आपल्या स्त्रीत्वाची जाणीव कधी विसरत नाही, झोपेतून उठल्यावर तिला कुठे जायचे असेल तर ती चुकूनही पुरुषी कपडे घालणार नाही, कारण स्त्री असल्याचे ती कधीही विसरत नाही. झोपेतही तिला आपण स्त्री आहोत याची जाणीव असते. अगदी याचप्रमाणे सत्याचा अनुभव तुमची मूळ प्रवृत्ती व्हावी. तुम्ही व तुमचा अनुभव एकरूप असावा. त्यानंतर ‘मी’ म्हणणारी वेगळी व्यक्ती उरू नये.
हीच समज... दृढता... स्वबोध आता जागृत होत आहे. स्थितप्रज्ञतेच्या मार्गावरून आज अनेक लोक जात आहेत. त्यांच्या अनुभवाचे सार यात समाविष्ट केले आहे. हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर अनुभवाच्या ज्ञानाचे सार आहे, अर्क आहे. आजमीतीला जे स्वबोधप्राप्तीच्या मार्गावरून जात आहेत, त्यांच्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शकाचे काम करेल. लहान, सरळ परंतु गहन संकेत व गोष्टींच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन मिळेल.
लहानपणी तुम्ही काही गोष्टी ऐकल्या असतील, वाचल्या असतील, एखादा चित्रपट किंवा नाटक बघितले असेल. आता आठवून बघा की त्यातल्या कोणत्या गोष्टीमुळे तुमच्या मनात स्वबोध जागृत झाला व ज्याने तुम्हाला ‘मी कोण आहे?’ ‘माझे खरे स्वरूप कोणते?’ यावर विचार करण्यास भाग पाडले? आज तुम्ही अशा अनेक गोष्टी, रूपके जाणून घेणार आहात ज्यांच्यामुळे तुमच्या जीवनात क्रांती घडून येईल व एक नवीन समज निर्माण होईल. गरज आहे फक्त डोळे अर्धवट बंद करण्याची म्हणजे मनन करण्याची, जेणेकरून जीवनाचे रहस्य पूर्णपणे उघडेल. तुम्ही तुमचे खरे स्वरूप जाणू शकाल... गोष्टीत दडलेले पुरावे समजू शकाल... प्रापंचिक जबाबदार्या सांभाळून या महासागररूपी ईश्वराचा (सेल्फचा) अनुभव घेऊ शकाल.
हे रूपक एकदा वाचून जर समजले नाही तर थोड्या दिवसांनी पुन्हा वाचा. लवकरच तुमच्या लक्षात येईल की ही प्रतीके, गोष्टी फक्त गोष्टी नसून या स्वबोध प्राप्तीच्या अवस्थेचे सार आहे. तुमच्या स्व-स्वरूपाची ओळख आहे.
चला तर, स्वतःला स्वतःशी भेट घालून देण्याची योजना (संकल्प) करू
सरश्रींचा आध्यात्मिक शोधाचा प्रवास त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असतानाच त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचं अध्ययन केलं. त्याचबरोबर या शोधकाळात त्यांनी अनेक ध्यानपद्धतींचा अभ्यासही केला. त्यांच्यातील या जिज्ञासेने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केलं. जीवनाचं रहस्य समजण्यासाठी त्यांनी प्रदीर्घ काळ मनन करून आपलं शोधकार्य सातत्याने सुरू ठेवलं. या शोधातूनच त्यांना ‘आत्मबोध’ प्राप्त झाला. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवलं, की अध्यात्माचा प्रत्येक मार्ग ज्या शृंखलेने जोडलेला आहे, तो म्हणजे ‘समज’(Understanding). आत्मबोधप्राप्तीनंतर त्यांनी अध्यापनाचं कार्य थांबवलं आणि जवळ जवळ दोन दशकांहूनही अधिक काळ आपलं समस्त जीवन मानवजातीच्या कल्याणासाठी आणि आध्यात्मिक विकासासाठी अर्पण केलं.
सरश्री म्हणतात, ‘‘सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा प्रारंभ जरी वेगवेगळ्या मार्गांनी होत असला, तरी सर्वांचा अंत मात्र एकच समज प्राप्त केल्याने होतो. ही ‘समज’च सर्व काही असून ती स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीसाठी या ‘समजे’चं श्रवणच पुरेसं आहे.’’ ही समज प्रकाशमान करण्यासाठी आजपर्यंत त्यांनी आध्यात्मिक विषयांवर तीन हजारांहून अधिक प्रवचनं दिली आहेत. या प्रवचनांद्वारे ते अध्यात्मातील अतिशय गहन संकल्पना सहज, सुलभ आणि व्यावहारिक भाषेत समजावून सांगतात. समाजातील प्रत्येक स्तरावरील मनुष्य सरश्रींद्वारे सांगितल्या जाणार्या या समजेचा लाभ घेऊ शकतो.
ही समज प्रत्येकाला आपल्या अनुभवातून प्राप्त व्हावी, यासाठी सरश्रींनी ‘महाआसमानी परमज्ञान शिबिर’ आणि त्यासाठी आवश्यक असणारी कार्यप्रणाली (सिस्टिम) तयार केली. तिचा लाभ आज लाखो लोक घेत आहेत. या प्रणालीला आय.एस.ओ. (ISO 9001:2015) प्रमाणपत्रही लाभलंय. या प्रणालीमुळेच अनेकांना सत्यमार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली आहे. या समजेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी ‘तेजज्ञान फाउंडेशन’ या आध्यात्मिक संस्थेचा पाया रचला. ‘हॅपी थॉट्सद्वारे उच्चतम विकसित समाजाची निर्मिती करणे,’ हेच या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे.
विश्वातील प्रत्येक मनुष्य आज सरश्रींच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकतो. त्यासाठी कोणत्याही धर्म, जात, उपजात, वर्ण, पंथ वा लिंग यांचं बंधन नसतं. विश्वाच्या प्रत्येक कानाकोपर्यांतील लोक आज ‘तेजज्ञान’च्या अनोख्या ज्ञानप्रणालीचा (System for Wisdom) लाभ घेत आहेत. याच व्यवस्थेचा आणखी एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे, दररोज सकाळी आणि रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी लाखो लोक विश्वशांतीसाठी प्रार्थना करत आहेत.
बेस्ट सेलर पुस्तक ‘विचार नियम’ शृंखलेचे रचनाकार म्हणूनही सरश्रींना ओळखलं जातं. केवळ पाच वर्षांच्या कालावधीत या पुस्तकाच्या 1 कोटीपेक्षा अधिक प्रती वितरित झाल्या आहेत. याशिवाय आजवर त्यांनी विविध विषयांवर 150 हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांपैकी ‘विचार नियम’, ‘स्वसंवाद एक जादू’, ‘शोध स्वतःचा’, ‘स्वीकाराची जादू’, ‘निर्णय आणि जबाबदारी’, ‘निःशब्द संवाद एक जादू’, ‘संपूर्ण ध्यान’ इत्यादी पुस्तकं बेस्ट सेलर झाली आहेत. ही पुस्तकं दहापेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवादित असून, पेंगुइन बुक्स, हे हाउस पब्लिशर्स, जैको बुक्स, मंजुळ पब्लिशिंग हाउस, प्रभात प्रकाशन, राजपाल अॅण्ड सन्स, पेंटागॉन प्रेस आणि सकाळ प्रकाशन इत्यादी प्रमुख प्रकाशन संस्थांद्वारे ती प्रकाशित झाली आहेत.