कवयित्री म्हणून नावलौकिक मिळवू इच्छिणारी युवती ज्या वयात गुलाबी प्रेमाच्या किंवा दु:ख व्यक्त करणार्या अत्यंत रोमँटिक अशा कविता लिहील, त्या वयात तसलिमा नासरिन स्त्री-पुरुषांच्या जीवनांतील असमानता, प्रेमाच्या नावावर होणारी प्रतारणा, निखळ प्रेमाच्या बदल्यात मिळणारी भोगलालसा, आत्मसमर्पणाच्या बदल्यात वाट्याला येणारी अवहेलना यांसारख्या विषयांवर कविता लिहिते. ’अतले अन्तरीण’ किंवा ’बालिकार गोल्लाछुट’ ह्यांतील कविता वाचल्यावर आपल्या लक्षात येते की, तसलिमा केवळ नावलौकिकाच्या लोभाने हातात लेखणी धरत नाही, तर अतिशय सहिष्णू असणार्या आणि ज्यांचा आवाजच दाबून टाकला गेला आहे, अशा स्त्रीजातीच्या बाजूने उभी राहून, ती समाजाच्या विरोधात आपला निषेध नोंदविते, आपल्या कवितांमधून. स्त्री-पुरुषांत समानता आणणे हेच तिचे लक्ष्य आहे. या लक्ष्यासाठीच तिला हातात लेखणी धरावी लागली आहे. असे असूनही तिच्या कवितेत फक्त संताप, विरोध किंवा कडवटपणा नाही. उलट, काही कवितांत वेदना आहे, काहींत आत्मसन्मानाची भावना आहे, तर काहींमध्ये प्रेमासाठी व्याकुळता आहे. जरी ती आपल्या एका कवितेत म्हणते, ’पाहून पुरुषाची पराकोटीची अश्लीलता जळते मनातल्या मनात नरकाच्या आगीत पतिव्रता साध्वी स्त्री.’ तरी दुसर्या एका कवितेत ती म्हणून जाते, ’एकदा जरी घातली साद एकदा प्रेम केल्यावर सर्व विसरून आसू ढाळते निष्पाप पोर.’स्त्रीच्या वाट्याला येणारी फसवणूक आणि पुरुषांचे तिच्यावर असलेले वर्चस्व यांसारख्या विषयांवर याआधी काही कथा, कविता लिहिल्या गेल्या असल्या, तरी तसलिमाप्रमाणे अगदी उघडपणे, स्पष्टपणे कोणीही लिहिलेले नाही. स्वत:च्या शरीरावर झालेल्या अत्याचारांच्या कथा तिच्याइतक्या समर्पक शब्दांत, कलात्मक भाषेत कोणीही मांडलेल्या नाहीत, हेच तर आहे तिचे वेगळेपण!