संजय बारु यांनी या पुस्तकात चित्रदर्शी, ओघवत्या शैलीत अनेक प्रसंगांचं चित्रीकरण केलेलं आहे. त्याद्वारे सरकारचा कारभार कसा चालतो, नेत्यांची जनमानसासमोर विशिष्ट प्रतिमा कशी उभी केली जाते, राजकारणांच्या कृतींमागे कोणत्या प्रेरणा असतात, ते प्रसारमाध्यमांचा स्वत:च्या स्वार्थासाठी कसा वापर करून घेतात, याचा पट वाचकांसमोर उलगडत जातो. दिल्लीच्या घडामोडींकडे नजर लावून बसलेल्यांना रंजक वाटतील असे अनेक छोटे-छोटे किस्सेसुद्धा यात आहेत.
अणुकराराच्या संदर्भात पंतप्रधानांच्या आणि त्यांच्या अधिकार्यांच्या देशांतर्गत तसंच अमेरिकेतील मुत्सद्द्यांशी ज्या अनेक चर्चा झाल्या, त्याचप्रमाणे डॉ. सिंग यांच्या पाकिस्तानशी वेळोवेळी झालेल्या वाटाघाटी इतिहासकारांना अत्यंत मौल्यवान वाटतील, यात शंकाच नाही. अशा प्रकारच्या माहितीचा खजिनाच लेखकानं या पुस्तकातून वाचकांसाठी खुला केला आहे.