पॅरिसमधील लूव्हर या सुप्रसिद्ध संग्रहालयाच्या वयस्कर व्यवस्थापकाचा संग्रहालयामध्येच खून होतो. विचित्र गोष्ट अशी की, त्यांच्या मृतदेहाभोवती जमिनीवर गोंधळून टाकणारी काही चिन्हे आणि खुणा दिसतात. या खुणांचा शोध घेण्याची कामगिरी त्याचवेळी पॅरिसमध्ये आलेल्या रॉबर्ट लँग्डन या हॉर्वर्ड विद्यापीठातील चिन्हशास्रतज्ञावर सोपवली जाते. फ्रान्समधील निष्णात गुप्तलिपीतज्ज्ञ सोफी नेव्ह्यू हिच्या मदतीने लँग्डन या चित्रविचित्र खुणांमधून खुनाला वाचा फोडणारी काही दिशा मिळते का, याचा शोध घेतो. यातूनच मग काही वेगळेच रहस्य उजेडात येते. जगप्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो दा विंचीच्या अनेक चित्रांमधून अत्यंत कौशल्यपूर्ण रीतीने दडवलेले संकेत दोघांना आश्चर्यचकित करतात.खून झालेले संग्रहालय-व्यवस्थापक "प्रायरी ऑफ सायन्स' या पंथाशी संबंधित असतात. ही स्फोटक माहितीही त्यांना कळते. अत्यंत गुप्तपणे काम करणाऱ्या या पंथामध्ये सर ऐझॅक न्यूटन, व्हिक्टर ह्यूगो आणि दा विंची अशा अनेक नामवंत व्यक्ती कार्यरत असतात. संग्रहालय-व्यवस्थापकांनी मती गुंग करून टाकणारी एक ऐतिहासिक सत्य जिवापाड जपलेले असते. हा शोध घेत असताना एक अव्यक्त प्रतिगामी शक्ती सतत रॉबर्ट आणि सोफीचा पाठलाग करीत असते. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेले एक स्फोटक सत्य खुणा आणि संकेतांच्या भूलभुलौय्यातून बाहेर येते.