दहशतवादाची समस्या जगातल्या महत्त्वाच्या देशांना भेडसावताना दिसते. अमेरिकेत दहशतवादानं थैमान घातलेलं असतानाच इंग्लंडमध्येही ते थैमान सुरू होतं आणि मग इंटरनेटवरून एक बुरखाधारी इस्लामी पाश्चात्त्य जगाविरोधात अतिविखारी भाषणं देताना, प्रचार करताना आणि पाश्चात्त्यांच्या हत्येचं आवाहन करताना आढळतो. त्याला टोपण नाव दिलं जातं. द प्रीचर. त्याच्या शोधाची जबाबदारी एका अधिकाऱ्याकडे सुपूर्द केली जाते. त्या प्रीचरपर्यंत हा अधिकारी कसा पोहोचतो आणि त्या शोधादरम्यान या दहशतवादाशी संबंधित घटनांची आणि व्यक्तींची संगती कशी लागत जाते, याचं थरारक चित्रण म्हणजे ‘द किल लिस्ट’ ही कादंबरी. दहशतवादाच्या रंदावलेल्या कक्षा, त्याची पाळंमुळं खणून काढण्याचं आव्हानात्मक आणि धाडसी काम, आधुनिक तंत्रज्ञानाचा दहशतवाद्यांकडून होत असलेला गैरवापर आणि या अनुषंगाने येणाऱ्या अनेक बाबींवर ‘द किल लिस्ट’ ही कादंबरी प्रकाश टाकते. त्यातील थरार अनुभवण्यासाठी ती वाचलीच पाहिजे.
फ्रेडरिक फोरसाइथ
ब्रिटनमधल्या केन्ट परगण्यातील अॅशफोर्ड इथे १९३८ मध्ये फ्रेडरिक फोरसाइथ यांचा जन्म झाला. ग्रॅनडा इथे शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी ते रॉयल एअर फोर्समध्ये भरती झाले आणि रॉयल एअर फोर्समधल्या अत्यंत तरुण अशा वैमानिकांपैकी एक बनले. १९५८ मध्ये त्यांनी रॉयल एअर फोर्स सोडले.
१९६१ ते १९६५ या काळात रॉयटरमध्ये पत्रकार म्हणून काम केल्यानंतर त्यांनी बीबीसीमध्ये असिस्टंट डिप्लोमॅटिक कॉरस्पॉन्डन्ट म्हणून काम पत्करले. बायफ्रा आणि नायजेरिया यांच्यामधल्या यादवी युद्धाच्या वेळी जुलै ते सप्टेंबर १९६७ या कालखंडात वार्ताहर म्हणून काम करताना काही वाद निर्माण झाल्यावर त्यांनी १९६८ मध्ये बीबीसीची नोकरी सोडली. फ्री-लान्स रिपोर्टर म्हणून पुन्हा एकदा बायफ्राला भेट दिल्यानंतर त्यांनी ‘द बायफ्रा स्टोरी’ हे आपले पहिले पुस्तक लिहिले.
१९७१ मध्ये प्रकाशित झालेली ‘द डे ऑफ द जॅकॉल’ ही त्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर अनेक कादंबऱ्या, दोन कथासंग्रह अशी पुस्तकेही लिहिली. ‘गेट फ्लार्इंग स्टोरीज’ या संग्रहात त्यांनी सर ऑर्थर कॉनन डॉयल, लेन डिलायटन, एच. जी. वेल्स इत्यादींच्या कथा एकत्रित केल्या आहेत. बारीकसारीक तपशिलासह संशोधन करून, कटकारस्थाने रचून आपल्या ओघवत्या भाषेत लिहिलेल्या त्यांच्या कादंबऱ्यांनी जगभर खळबळ माजवली आहे.
बाळ भागवत
अॅग्रो केमिकल्सच्या मुंबई डिव्हिजन मधून निवृत्त झालेल्या बाळ भागवत यांनी विज्ञान शाखेतून गणित विषयात पदव्युत्तर पदविका संपादित केली आहे. बाळ भागवत १९५८ ते ६८ दरम्यान मुंबई येथे सचिवालयात कार्यरत होते. त्यानंतर १९६८ ते ९८ मध्ये ते रॅलीज इंडिया लि. या कंपनीत नोकरी करत होते. त्यानंतर अॅग्रो केमिकल्सच्या मुंबई डिव्हिजन मध्ये टेकनिकल सेल्स अँड सेल्स को-ऑडिनेशन या पदावर कार्यरत असताना ते निवृत्त झाले.
त्यांच्या आजवरच्या साहित्यिक वाटचालीमध्ये ‘देव? छे परग्रहावरील अंतराळवीर’, ‘सागरकथा’ तर अनुवादित साहित्यामध्ये ‘एंजल्स अँड डेमन्स’, ‘द अफगाण’, ‘वन शॉट’, ‘ओशन ट्रँगल’, स्पेस ट्रँगल’, ‘किलींग फिल्डस’ या पुस्तकांचा समावेश आहे.