विज्ञान आणि तंत्रज्ञान, विशेषत: बायोटेक्नॉलॉजी आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रात आज होत असलेल्या अभूतपूर्व क्रांतीमुळं एकविसाव्या शतकातील जीवनावर फार मोठा परिणाम होत आहे. त्याच्या जोडीला असलेली जागतिकीकरणाची प्रक्रिया आणि बाजारपेठांचा विस्तार यामुळं एक नव्या प्रकारची जीवघेणी स्पर्धा आज रूढ होत आहे. त्यापोटी आपली जीवनशैली तसेच मूल्यव्यवस्था तळापासून ढवळून निघत आहे. त्यांच्यात होत असलेल्या आमूलाठा बदलाचा कॅनव्हास डॉ. बाळ फोंडके यांच्या या कथांना लाभलेला आहे. कुटुंबव्यवस्था, समाजजीवन, सांस्कृतिक वातावरण असं झंझावातात सापडल्यावर त्याच कुटुंबाचा, समाजाचा, संस्कृतीचा घटक असणार्या वैज्ञानिकाचं व्यावसायिक आयुष्यही झपाटल्यावाचून राहत नाही. त्याच चक्रावर्ताचं प्रतिबिंब या कथांमध्ये पडलेलं आहे. विज्ञानातील नवनव्या आविष्कारांची सांगड राजकारण, अर्थकारण, व्यापारी स्पर्धा यांच्याशी घातली गेली की, त्यातून तयार होणारं विलक्षण मिश्रण माणसांचे विविध स्तरांवरचे परस्परसंबंध, त्यांचं भावजीवन, त्यांची जिद्द, अहंभाव, मत्सर आणि महत्त्वाकांक्षा, प्रसिद्धीची झिंग आणि पैशाचा लोभ यांनाही व्यापून टाकते. षड्रिपुंचे तांडव सुरू होते. विज्ञानाच्या घोडदौडीपायी अस्तित्वात येत असलेल्या, या बीभत्स वास्तवाची भेदक अनुभूती देणार्या या कथा ’व्हर्च्युअल रिअॅलिटी’च्या गूढरम्य प्रांगणात नेऊन सोडतात, स्थल आणि काल यांना छेद देणार्या पाचव्या डायमेन्शनमध्ये घेऊन जातात.