तो घराचा दरवाजा लोटतो. नेहमीसारखीच कडी लावलेली नसते. तो अंधारात बघतो. अंथरुणावर मुलं अस्ताव्यस्त झोपलेली असतात. बटण लावण्याचे त्याच्या जिवावर येते. तो अंधारात कपडे बदलतो. बायकोकडे तो पाहतो.
एका कुशीवर ती झोपलेली असते. अंधारातही त्याची नजर तिच्या आकृतीवर खिळते. तो बायकोच्या पांघरुणात घुसतो.गाढ झोपलेली त्याची बायको स्पर्शाने जागी होते. दहा वर्षांचा परिचयाचा स्पर्श ती सहज ओळखते. ती गळ्यात हात टाकीत कुजबुजते,`वीस रुपये आणलेत?' बायकोच्या प्रश्नाने त्याची नशा खाडकन् उतरते. एखाद्या धंदेवाल्या बाईने प्रश्न विचारावा, तसे त्याला वाटते. त्याची सारी गात्रे बर्फासारखी थंडगार पडतात. शरीराचे मुटकुळे करून तो बाजूला जाऊन पडतो. गर्भाशयात मूल झोपावं, तसा तो दिसत असतो.