पंख न फुटलेल्या चिमुकल्या पाखरांचे घरटे रक्षण करते; पण पंख फुटलेल्या पाखरांना तेच घरटे पिंजऱ्यासारखे होते. कुटुंब, घर, देव, धर्म, प्रेम, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, इत्यादिकांविषयीच्या आपल्या आजच्या कल्पनांची हुबेहुब हीच स्थिती आहे. मानवजातीच्या बाल्यात या सर्व कल्पना सुंदर होत्या; इतकेच नव्हे, तर समाजाचे संरक्षण करण्याचे आणि सामथ्र्य वाढविण्याचेच काम त्यांनी केले आहे. पण आजच्या यंत्रप्रधान संस्कृतीत या जुन्या कल्पनांचा काडीमात्र तरी उपयोग आहे का ? मध्यम वर्गातल्या बुद्धिवान व कर्तृत्ववान तरूणत्तरुणींची बुद्धी पिंजऱ्यात अडकून पडली आहे. त्यांचे कर्तृत्व कुटुंबाच्या तुरुंगापलीकडे सहसा जाऊच शकत नाही. मध्यम वर्गाचे हे प्रतिनिधी राजकीय व सामाजिक सुधारणेच्या गोष्टी तोंडाने बोलत असले, तरी वस्तुस्थितीकडे ते डोळेझाक करीत आहेत. शिक्षण, कुटुंबव्यवस्था, संपत्तीची वाटणी, स्त्रीपुरुषांचे संबंध, इ. बाबतींतल्या जुना मार्ग खाचखळग्यांनी भरलेला असून, समाजाच्या गाड्याला त्यामुळे पदोपदी भयंकर धक्के बसत आहेत, हे जाणूनही नव्या पाउलवाटेकडे त्यांचे पाय वळत नाहीत. याचे मुख्य कारण आहे : घरट्याबाहेर न पडण्याची वृत्ती ! वौयक्तिक जीवनाची आसक्ती आणि सामाजिक जीवनाविषयीची उदासीनता.