अरविंदाला कुंदेच्या नि आपल्या एकान्तातल्या पहिल्या भेटीची आठवण झाली. त्या रात्री ‘मृगाचा झिमझिम पाऊस’ सुरू झाला होता. त्याला वाटले, प्रीतिचे रूप त्या पावसासारखे असते.– आणि तिचे दुसरे रूप... त्या दुसऱ्या उत्कट रूपाचे दर्शन त्याला आजच प्रथमत: झाले. त्याला वाटले, हे दुसरे रूप ‘हस्ताच्या पावसा’सारखे असते. ...हा पाऊस अगदी अचानक येतो, ऊन तापून-तापून जीव नकोसा झाल्यावर येतो. पण हजार हत्तींच्या सोंडांनी पाणी शिंपून तो तापलेल्या पृथ्वीला घटकाभरात शांत करतो.