नाकासमोर जाणाऱ्या सरळ, साध्या माणसाच्या जीवनक्रमाचे चित्रण जसे तुम्हांला वृत्तपत्रात आढळणार नाही, तसेच ते ललितवाय्मयातही प्रामुख्याने प्रतिबिंबित होणार नाही. मानवी जीवनातली युद्धे, भूकंप आणि वादळे हे असल्या वाङ्मयाचे मुख्य विषय असतात. रॉबर्ट लिंडचा हा सिद्धांत निरपवाद नसला, तरी वाङ्मयातल्याच प्रीतीच्या चित्रणाच्या बाबतीत तो बव्हंशी सत्य आहे. प्रत्यक्ष आयुष्यात प्रीतीच्या मार्गावर पारिजातकाची पुष्पे पसरलेली असावीत, असे आपण म्हणत असतो. पण गमतीची गोष्ट की, वाङ्मयात मात्र मार्गावरल्या काट्याकुट्यांनी पदोपदी रक्तबंबाळ होणारी प्रीतीची मूर्तीच आपल्याला अधिक मनोहर वाटते; आणि शेवटी मनुष्याला जगात जो अनुभव येतो, त्यात फुलेही नसतात आणि काटेही नसतात. सामान्य मनुष्याच्या प्रीतिमार्गावर फक्त खडे असतात. ते त्याला मधून मधून चांगलेच बोचतात. त्या दु:खाने प्रसंगी तो अगदी रडकुंडीला येतो. पण त्याच वेळी कुठून तरी येणार्या शीतल वायुलहरी त्याचा शीण नाहीसा करून त्याला उल्हसित करीत असतात. तो पुन्हा शीळ घालीत पुढे चालू लागतो.