हजारो वर्षांपासून श्रीकृष्ण भारतीय मन व्यापून दशांगुळे उरला आहे. भारतीय समाज व संस्कृती यांवर त्याचा अमीट असा ठसा उमटलेला आहे. ‘श्रीमद्भागवत’, ‘महाभारत’, ‘हरिवंश’ व काही पुराणांत श्रीकृष्णचरित्राचे अधिकृत संदर्भ सापडतात. परंतु गेल्या हजारो वर्षांत त्यावर सापेक्ष विचारांची आणि अतक्र्य चमत्कारांची पुटंच पुटं चढलेली आहेत. त्यामुळे त्याचं ‘श्री’युक्त सुंदर, तांबूस-नीलवर्णी, सावळं रूपडं घनदाट झालं आहे, वास्तवापासून शेकडो योजनं दूर दूर गेलं आहे. श्रीकृष्ण हा ‘भारतीय’ म्हणून असलेल्या जीवनप्रणालीचा पहिला उद्गार आहे! त्याच्या चक्रवर्ती जीवनचरित्रात भारताला नित्यनूतन व उन्मेषशाली बनविण्याचा ऐवज ठासून भरला आहे. श्रीकृष्णाच्या जीवनसरोवरातील दाटलेलं शेवाळ तर्वâशुद्ध सावधपणे अलगद दूर सारल्यास त्याचं ‘युगंधरी’ दर्शन शक्य आहे, हे ‘मृत्युंजय’कारांनी जाणलं. आणि त्यांच्या प्रदीर्घ चिंतनातून, सावध संदर्भशोधनातून, डोळस पर्यटनातून व जाणत्यांशी केलेल्या संभाषणातून साकारली ही साहित्यकृती – ‘युगंधर’!!