पाउलो कोएलो यांचं जीवन त्यांच्या पुस्तकांचा मूळ प्रेरणास्रोत आहे. त्यांनी मृत्युचा सामना केला, वेडेपणाचं टोक गाठलं, मादक पदार्थांचं सेवन केलं, यातना झेलल्या, जादूचे आणि हातचलाखीचे प्रयोग केले, तत्त्वज्ञानाचा आणि धर्माचा सखोल अभ्यास केला, आत्मविश्वास गमावला आणि पुन्हा प्राप्त केला आणि प्रेमातील वेदना व आनंद अनुभवला. जगामध्ये स्वतःचं स्थान शोधताना त्यांनी त्या आव्हानांची उत्तरं शोधली, ज्यांना प्रत्येक व्यक्तीला सामोरं जावं लागतं. ते असं मानतात की, आपलं नशीब जाणण्यासाठी ज्या शक्तीची आपल्याला आवश्यकता असते, ती आपल्या आतमध्येच असते. आतापर्यंत त्यांच्या पुस्तकांचा 82 भाषांमध्ये अनुवाद झाला आहे आणि 170पेक्षा अधिक देशांमध्ये 32 कोटींपेक्षा जास्त प्रतींची विक्री झाली आहे. 1998मध्ये त्यांनी लिहिलेल्या द अल्केमिस्ट या कादंबरीच्या 8.5 कोटींपेक्षा अधिक प्रतींची विक्री झाली आहे. द अल्केमिस्टला मलाला युसूफझाई आणि फॅरेल विलियम्ससारख्या लोकांनी आपला प्रेरणास्रोत मानलं आहे. ते ब्राझिलियन अॅकेडमी ऑफ लेटर्सचे सदस्य आहेत आणि त्यांना ‘शेवलिअर् द लॉरद्रे नॅशनल द ला लिजन ऑनर’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. 2007मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे ‘मेसेंजर ऑफ पीस’ म्हणून त्यांना नियुक्त केले होते.