‘उठा उठा दिवाळी आली... मोती स्नानाची वेळ झाली.’ साधारणतः ही जाहिरात टीव्हीवर झळकायला लागली की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वेध लागतात ते दिवाळीचे, त्यातच लहान मुलांना जसे फटाक्यांचे आणि गोड धोड फराळाचे वेध लागतात त्याचप्रमाणे रसिक वाचकांना वेध लागतात ते दिवाळी अंकाचे.
रसिक वाचकांनी भरभरून दिलेल्या प्रेम आणि आशीर्वादामुळे दिवाळी अंक आपल्या ७ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही रसिक वाचकांना नवनवीन लेख, कविता, चारोळ्यांची पर्वणी देण्याचा प्रयत्न केला आहे.
पुस्तकरूपी दिवाळी अंक हातात घेऊन वाचण्याची मज्जा ही जरी वेगळी असली तरीही, आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात वाचक प्रेक्षकांना मोबाईल मधील इंटरनेटचा वापर करून कुठेही दिवाळी अंक वाचता यावा आणि त्यांना त्या वाचनातून आनंद मिळावा या एकमेव हेतूने सादर केलेला हा दिवाळी अंक बघता बघता वाचकांनी उचलून धरला आणि नव-नवीन लेखकांनीही आम्हाला नेहमीच साथ दिली ती त्यांच्या लेखांच्या आणि कवितांच्या रुपात. तसेच साहित्य क्षेत्रात मुरलेल्या दिग्गज लेखकांनीही आम्हांला त्यांच्या साहित्याच्या रुपात आशीर्वाद दिले. या सर्वांमुळे जमून आला हा दिवाळी अंक, आणि बघता बघता या दिवाळी अंकाने आपली ७ वर्षे पूर्ण केली. याचे आभार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदत केलेल्या सर्वांचेच.
याही वर्षी दिग्गज आणि नव्याने ओळख होत असलेल्या लेखकांच्या साहित्यांची मेजवानी आम्ही रसिक वाचकांसाठी सादर करीत आहोत. या मेजवानीचा तुम्ही आस्वाद घ्याल ही आशा...
ही दिवाळी तुम्हां सर्वांना सुख समाधानाची आणि भरभराटीची जाओ आणि तुमचे आमच्यावरचे प्रेम हे उत्तरोत्तर असेच वाढत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
लेख / कविता सादर करणारे साहित्यीक:
डॉ. सुधीर रा. देवरे, निमिष सोनार, भरत उपासनी, सुरेश पुरोहित, मंजुषा सोनार, मयुर बागुल, मेधा कानिटकर, विक्रम अरने, विजयकुमार देशपांडे, वैष्णवी पारसे, अजित विष्णू उमराटकर, अरुण वि. देशपांडे, आशिष अरुण कर्ले, कल्पना देशमुख, गणेश पावले, डॉ. ऋतुजा विजय वेळासकर, नागेश सू. शेवाळकर, निखिल शेलार, पूनम देवीदासराव कुलकर्णी, प्रभाकर पटवर्धन, प्रिया गौरव भांबुरे, सुवर्णा सोनवणे, स्वप्ना अमृतकर, अक्षता दिवटे, अजय महादेव पाटील