सूक्ष्म निरीक्षणांमधून आकळलेल्या मानवी व्यवहारांच्या तपशीलवार वास्तववादी चित्रणामुळे महादेव मोरे यांचा व्यक्तिचित्रणांचा हा संग्रह मराठी साहित्यात महत्त्वाचा ठरतो. जागोजागी आढळणारी बेळगाव-निपाणी या महाराष्ट्राच्या सीमाभागातली वैशिष्ट्यपूर्ण बोलीभाषा, हेही या संग्रहाचे वैशिष्ट्य आहे. या निमित्ताने मराठी वाचकांना या बोलीतल्या काही शब्दांचा परिचय होईल. यात भेटणारी माणसं ही विविध जाती-जमातींची आहेत. ती गरीब, भोळीभाबडी आहेत, तशीच इरसालही आहेत; परिस्थितीने गांजलेली, पिचलेली, निराश झालेली आहेत, तशीच स्वप्नं पाहणारी, आशेच्या एका तंतूमागे धावणारीही आहेत, लेखकाच्या जीवनातले कडू-गोड प्रसंगही आहेत. मुख्य धारेतल्या मराठी साहित्याच्या परिघाबाहेरची ही माणसं कधी हसवतात; रडवतात, अचंबित करतात, मनात करुणभाव उत्पन्न करतात; तर कधी जीवनाबद्दलची अनोखी अंतर्दृष्टी देऊन जातात.