पालखी... भक्तीची, निष्ठेची, ध्येयाची, प्रेमाची, समानतेची... पालखी मानवतेची !!! नाचतो पताका हाती, टाळ नि मृदंग । चालती पावले, मुखी विठोबाचे नाम । ज्येष्ठातल्या पावसाने न्हाऊन निघालेली धरती आषाढात नटते, फुलते, ती वारक-यांच्या स्वागताला. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस । संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला तत्त्वज्ञानाची बैठक दिली आणि तुकारामांनीही याच तत्त्वज्ञानाची पताका वारीच्या सोहळ्यात सा-या आसमंतात फडकवली. ‘पंढरीची वारी’ हे वारक-यांचे व्रत आहे, तसेच ती उपासना आहे, साधना आहे. सकल समाजाला संतांनी दाखविलेला परमार्थाचा सर्वांत सोपा असा महामार्ग म्हणजे वारी, सामूहिक भक्तीचे प्रतीक म्हणजे वारी, सांस्कृतिक लोकजीवनाचा प्रवाह म्हणजे वारी. जिथे स्त्री-पुरुष हा भेद नाही, जात-पात नाही, वर्ण-भेद नाही, जिने आध्यात्मिक लोकशाहीची स्थापना केली, शास्त्र-प्रामाण्याला वा जातिव्यवस्थेला धक्का न लावता स्त्रियांना तसेच शूद्रांना आत्मविकासाचा मार्ग खुला करून दिला. अशा प्रकारे भक्तिप्रेमाची अनुभूती घेऊन सदाचारी जीवनाची वाटचाल घडविणारा नैतिकतेचा एक मूर्तिमंत अविष्कार म्हणजे वारी!!! कोसळणा-या सरींची पर्वा नाही, पायाखालच्या दगडधोड्यांची चिंता नाही, स्पृश्य-अस्पृश्याचा भेद नाही वा खाण्यापिण्याची शुद्ध नाही, असे भक्तिरसात न्हाऊन निघालेले मन स्वत:ला विसरून एक-एक पाऊल टाकत कधी ‘आषाढीला’ पंढरीत दाखल होते, समजतच नाही. भक्तांची मांदियाळी, चंद्रभागेतीरी । ओढविठोबाची देवा, वाहे डोळाभरी । अशी ‘सकलसमाज घडवणारी’ वारी आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी जीवनाची एक ‘मार्गदर्शिका’च! तर तुम्हीही तुमचे शब्द वारीभोवती, तुमच्या ‘मार्गदर्शका’ भोवती गुंफून विणलेली शब्दमाला आमच्या पर्यंत पोहोचवू शकता. आपले लेखन ई-मेल ने खालील पत्त्यावर पाठवा – [email protected] निवडक लेखनाचा अंकात समावेश करण्यात येईल. याची नोंद घ्यावी. तसेच उत्तम लेखासाठी पारितोषिक म्हणून कोणत्याही एका खरेदीवर ४०% सवलत देण्यात येईल. तुमच्या पत्रोत्तराच्या अपेक्षेत, मेहता मराठी ग्रंथजगत