इंजिनिअरिंग म्हणजेच अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असताना सामाजिक कारणांकरता वेगवेगळे म्युझिक व्हिडिओे निर्माण करण्याचा छंद शंतनू नायडूला होता. त्यातूनच, ‘पॉज् फॉर अ कॉज्’ या नावाचा व्हिडिओ त्याने प्राण्यांच्या हितासाठी काढला. त्यायोगे, तो स्वतःला त्या क्षेत्रात प्रस्थापित करू पाहत होता. ती त्याची सुरुवात होती. ऑटोमोटिव्ह डिझाईन इंजिनिअर म्हणून टाटा एल्क्सी इथे काम करत असताना त्याने ‘मोटोपॉज्’ नावाचा स्टार्टअप कार्यक्रम सुरू केला. त्या माध्यमातून, भारतातल्या भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात रिफ्लेक्ट होणार्या कॉलर्स घालण्याचं काम त्याने केलं, त्यामुळे रात्री रस्त्यांवर कुत्र्यांना होणार्या अपघाताचं प्रमाण कमी व्हायला मदत झाली. त्याच्या या उद्यमशीलतेमध्ये श्री. रतन टाटा यांनी प्रामुख्याने गुंतवणूक केली.