हा विचार भावडांना एकमेकांना सांगितला. त्यांनाही तो पटला आणि आईबाबांना शब्दात उतरावयाला सुरूवात केली. बंडुभाऊ आणि नभामाई हे मोबाईलवर जीबोर्डच्या माध्यमातून बोलून टाईप करायला या निमित्ताने शिकले. त्यांचा मोठा प्रश्न सुटला. प्रभाताईने लिहून व अतुलने त्याचे फोटो काढून पाठविले. भय्यासाहेब व विभामाई यांना त्यांचे लिखाण पाठविणे जमले नाही, त्यामुळे ते यात राहून गेले. माई आत्याचा मुलगा बाळ उर्फ विजयने पण लिहिले. ते त्याचा मुलगा श्रीपादने मोबाईलवर टाईप करून पाठविले.
गेल्या 25 वर्षात आईबाबांच्या आठवणी आल्या नाहीत त्यामुळे मन हळवे होऊन, लहानपणच्या आठवणीने डोळ्यात पाणी आले नाही, असे कधी झाले नाही. खरे म्हणजे हा विचार मनात यायलाच उशीर झाला. आणि त्यानंतर लिहिलेले संपादन करण्यात पण वेगवेगळे कारणाने विलंब होत गेला. प्रत्येकाचे लिखाण त्याच्या शब्दात दिले आहे. त्याची भावना थेट इतरापर्यंत तशाच्या तशी पोहचावी, ही या मागील कल्पना आहे. त्यामुळे थोडी पुनरावृत्ती पण झाली आहे, पण ते स्वाभाविक आहे.
सर्वांजवळील आईबाबांचे फोटो पण यानिमित्ताने एकत्र येऊन सर्वांसाठी ते उपलब्ध झाले आहेत. या सर्वांमुळे आईबाबांचे सर्व अंगांनी दर्शन घडविणारे चित्र-चरित्र उभे झाले असावे, असे वाटते. अर्थात याबद्दल इतरांनीच काय ते सांगावे. रामायण म्हणजे रामाचा जीवन प्रवास. त्याप्रमाणे हे पुस्तक रामचंद्रायण आणि सरलायण या दोन भागात आहे. या निमित्ताने त्यांच्या आठवणींचा आमचाही सलग प्रवास झाला, हा वेगळा. आनंद मिळाला.
आम्हा सर्वांची ही भावांजली पुस्तक रूपाने (ई बुक) आपल्या सर्वांसमोर ठेवीत आहोत. बाबांची तिथी 21 मे 2021 ला आहे. त्यादिवशी याचे विधिवत प्रकाशन करीत आहोत.
सर्वांनी हे वाचावे. आईबाबांच्या गुणांचे स्मरण करावे आणि त्यांचा आदर्श जीवनात बाळगून सुखी व्हावे, हीच यामागची भावना आहे. इति...