'परिवर्तन' जीवनाचा न बदलणारा, अटळ असा नियम आहे. जणू निसर्गाकडून मिळालेलं वरदानच! विश्वात परिवर्तन आवश्यकच आहे. कारण बदल घडल्यानेच नवनिर्मिती होते, विकास होतो.
खरंतर परिवर्तन घडत असतं ते जीवनाचं संतुलन कायम राखण्यासाठीच. जेणेकरून जुन्या गोष्टी काळाच्या पडद्याआड जाऊन त्या जागी नूतन, विकसित रूप उदयाला यावं. मनुष्याने या परिवर्तनाला वरदान समजलं तर त्याच्या जीवनात निरंतर विकास होत राहील. जसं, लहान मुलं मोठी झाल्यानंतर त्यांच्यासाठी नवीन वस्त्रं, पादत्राणं आणली जातात, तसंच मनुष्याच्या जीवनात बदल घडल्याने त्याच्यात अनेक गुण विकसित होतात.
मात्र मनुष्य परिवर्तनाला अभिशाप बनवतो. ज्यायोगे तो संकुचित विचारसरणीमुळे परिवर्तनाचा केवळ एकच पैलू पाहू शकतो. त्यात दडलेला स्वतःचा विकास पाहू शकत नाही. थोड्याशा सुखसुविधांच्या मोहापायी मनुष्य परिवर्तनाचा अस्वीकार करून प्रगतीची सुवर्णसंधी व्यर्थ दवडतो.
परिवर्तनापासून पलायन करण्याच्या वृत्तीतून मुक्त होण्याचं कौशल्य प्रस्तुत पुस्तकात जाणूया... शापाला वरदानात बदलू या. याखेरीज आपण जाणणार आहोत -
* परिवर्तनात दडलेले संकेत कसे पाहावेत?
* अनुमती देऊन संपूर्ण सफलता कशी प्राप्त करावी?
* अनुकूलनशील कसं आणि का बनावं?
* परिवर्तनाचा स्वीकार करण्यासाठी कोणता मंत्र लक्षात ठेवावा?
* आंतरिक विरोध कसा समाप्त करावा?
* विश्वाचं अपरिवर्तित सत्य काय आहे?
सरश्रींचा आध्यात्मिक शोधाचा प्रवास त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असतानाच त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचं अध्ययन केलं. त्याचबरोबर या शोधकाळात त्यांनी अनेक ध्यानपद्धतींचा अभ्यासही केला. त्यांच्यातील या जिज्ञासेने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केलं. जीवनाचं रहस्य समजण्यासाठी त्यांनी प्रदीर्घ काळ मनन करून आपलं शोधकार्य सातत्याने सुरू ठेवलं. या शोधातूनच त्यांना ‘आत्मबोध’ प्राप्त झाला. आत्मसाक्षात्कारानंतर त्यांना जाणवलं, की अध्यात्माचा प्रत्येक मार्ग ज्या शृंखलेने जोडलेला आहे, तो म्हणजे ‘समज’(Understanding). आत्मबोधप्राप्तीनंतर त्यांनी अध्यापनाचं कार्य थांबवलं आणि जवळ जवळ दोन दशकांहूनही अधिक काळ आपलं समस्त जीवन मानवजातीच्या कल्याणासाठी आणि आध्यात्मिक विकासासाठी अर्पण केलं.
सरश्री म्हणतात, ‘‘सत्यप्राप्तीच्या सर्व मार्गांचा प्रारंभ जरी वेगवेगळ्या मार्गांनी होत असला, तरी सर्वांचा अंत मात्र एकच समज प्राप्त केल्याने होतो. ही ‘समज’च सर्व काही असून ती स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीसाठी या ‘समजे’चं श्रवणच पुरेसं आहे.’’ ही समज प्रकाशमान करण्यासाठी आजपर्यंत त्यांनी आध्यात्मिक विषयांवर तीन हजारांहून अधिक प्रवचनं दिली आहेत. या प्रवचनांद्वारे ते अध्यात्मातील अतिशय गहन संकल्पना सहज, सुलभ आणि व्यावहारिक भाषेत समजावून सांगतात. समाजातील प्रत्येक स्तरावरील मनुष्य सरश्रींद्वारे सांगितल्या जाणार्या या समजेचा लाभ घेऊ शकतो.
ही समज प्रत्येकाला आपल्या अनुभवातून प्राप्त व्हावी, यासाठी सरश्रींनी ‘महाआसमानी परमज्ञान शिबिर’ आणि त्यासाठी आवश्यक असणारी कार्यप्रणाली (सिस्टिम) तयार केली. तिचा लाभ आज लाखो लोक घेत आहेत. या प्रणालीला आय.एस.ओ. (ISO 9001:2015) प्रमाणपत्रही लाभलंय. या प्रणालीमुळेच अनेकांना सत्यमार्गावर वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली आहे. या समजेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी ‘तेजज्ञान फाउंडेशन’ या आध्यात्मिक संस्थेचा पाया रचला. ‘हॅपी थॉट्सद्वारे उच्चतम विकसित समाजाची निर्मिती करणे,’ हेच या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे.
विश्वातील प्रत्येक मनुष्य आज सरश्रींच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकतो. त्यासाठी कोणत्याही धर्म, जात, उपजात, वर्ण, पंथ वा लिंग यांचं बंधन नसतं. विश्वाच्या प्रत्येक कानाकोपर्यांतील लोक आज ‘तेजज्ञान’च्या अनोख्या ज्ञानप्रणालीचा (System for Wisdom) लाभ घेत आहेत. याच व्यवस्थेचा आणखी एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे, दररोज सकाळी आणि रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी लाखो लोक विश्वशांतीसाठी प्रार्थना करत आहेत.
बेस्ट सेलर पुस्तक ‘विचार नियम’ शृंखलेचे रचनाकार म्हणूनही सरश्रींना ओळखलं जातं. केवळ पाच वर्षांच्या कालावधीत या पुस्तकाच्या 1 कोटीपेक्षा अधिक प्रती वितरित झाल्या आहेत. याशिवाय आजवर त्यांनी विविध विषयांवर 150 हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांपैकी ‘विचार नियम’, ‘स्वसंवाद एक जादू’, ‘शोध स्वतःचा’, ‘स्वीकाराची जादू’, ‘निर्णय आणि जबाबदारी’, ‘निःशब्द संवाद एक जादू’, ‘संपूर्ण ध्यान’ इत्यादी पुस्तकं बेस्ट सेलर झाली आहेत. ही पुस्तकं दहापेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवादित असून, पेंगुइन बुक्स, हे हाउस पब्लिशर्स, जैको बुक्स, मंजुळ पब्लिशिंग हाउस, प्रभात प्रकाशन, राजपाल अॅण्ड सन्स, पेंटागॉन प्रेस आणि सकाळ प्रकाशन इत्यादी प्रमुख प्रकाशन संस्थांद्वारे ती प्रकाशित झाली आहेत.