आजच्या सामाजिक समस्या विविध कारणांनी निर्माण झालेल्या आहेत. एकीकडे जीवन यांत्रिक आणि म्हणूनच सर्वस्वी अर्थप्रधान होऊ पाहत आहे. दुसरीकडे समतेचे निशाण सर्व सामाजिक क्षेत्रांत जोरजोराने फडफडू लागले आहे. अशा वेळी जे जीवनविषयक कूटप्रश्न उत्पन्न होतात, त्यांची उत्तरे गोड, गुळगुळीत शेवट असणार्या गोष्टीनी, स्वप्नरंजनावर आधारलेल्या तत्त्वज्ञानाने किंवा आत्मवंचना करून घेणार्या सांस्कृतिक विचारांनी देता येणार नाहीत....विषमतेवर आधारलेल्या सध्याच्या समाजरचनेतल्या अगदी ढोबळ अशा नीतिनियमांना सुद्धा पांयाखाली तुडवून जो पैसा संपादन केला जातो, त्याच्याकडे माणुसकीची चाड असणार्या समाजाने तिरस्कारानेच पाहिले पाहिजे..आपला झगडा यंत्राशी नसून विषमतेला अंधपणे साहाय्य करणार्या यांत्रिक संस्कृतीशी आहे...